मॅकन्यूज :
दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये सापडलेला नवीन करोना विषाणू हा वेगाने पसरणारा असला तरी प्राणघातक नाही असे आतापर्यंतच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. ‘व्हेरियंट अंडर इनव्हेस्टिगेशन २०२०१२/०१ किंवा बी १.१.७’ या संदर्भनावाखाली नवीन विषाणूवर संशोधन सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेतही करोनाचा नवीन विषाणू सापडला होता. ब्रिटनमध्ये जो विषाणू सापडला आहे तो १३ डिसेंबर पासून ११०८ जणांमध्ये सापडला आहे. पुढील दोन आठवडय़ात त्यावरील संशोधनाचे निष्कर्ष हाती येतील. ब्रिटनमधील कोविड १९ जिनॉमिक्स युके (कॉग युके) ही संस्था त्या देशातील करोना विषाणूंवर लक्ष ठेवत असते त्यात हा नवा विषाणू या संस्थेस सापडला आहे. कोविड १९ जिनॉमिक्स कंपनीने नवीन विषाणूची जनुकीय क्रमवारी उलगडली आहे. त्यांच्याकडे कोविड १९ विषाणूचा आतापर्यंतचा सर्वात मोठा माहिती संच आहे.
ब्रिटनमध्ये नवीन विषाणूचा जो नमुना मिळाला आहे. तो पाहता हा विषाणू आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरला आहे. पण तो किती प्रमाणात हे अजून स्पष्ट नाही. विषाणूच्या काटेरी प्रथिनात आतापर्यंत चार हजार उत्परिवर्तने झाली असून ‘डी ६१४ जी’ हा नवीन प्रकार अलीकडे आढळला, त्याआधी स्पेनमध्ये ‘२० ए इयू १’ हा आणखी प्रकार सापडला होता. सध्या तरी उत्परिवर्तनावरुन विषाणूची घातकता सांगणे कठीण आहे, असे मत कॉग युके या संस्थेने व्यक्त केले आहे.
नवीन करोना विषाणू हा अनेक उत्परिवर्तनांचा परिपाक असून त्यात काटेरी प्रथिनात बदल दिसून आले आहेत. आरएनए विषाणूच्या अनेक भागात बदल झाले असून प्राथमिक माहितीनुसार हा विषाणू जास्त संक्रमणशील आहे. या विषाणूत झालेले उत्परिवर्तन एन ‘५० आयवाय’नावाने संबोधले गेले आहे. ते काटेरी प्रथिनाच्या भागात झाले आहे हेच प्रथिन मानवी पेशीतील एसीइ २ संग्राहकास चिकटते. याचा अर्थ विषाणूतील उत्परिवर्तनांमुळे तो जास्त घातक नाही, तरी जास्त संक्रमणशील रुप घेतो. उत्पर्वितनांमुळे विषाणू जास्त पसरण्याच्या शक्यतेबाबत अजूनही संशोधन चालू आहे.