महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणारी बडीकाॅप योजना पुण्यात पुन्हा सुरू..

0
slider_4552

पुणे :

खासगी कंपनी, कार्यालये तसेच शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या बडीकाॅप योजनेच्या कामकाजावर करोना संसर्गामुळे परिणाम झाला होता. गेले दोन वर्ष बडीकाॅप योजनेतील प्रणाली बंद होते. संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा बडीकाॅप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. एखाद्याने महिलेने मदत मागितल्यास तिला त्वरीत मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

गृहिणी तसेच नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी बडीकाॅप योजना सुरु केली होती. करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष या योजनेच्या कामकाजावर परिणाम झाला होता.

पुणे शहरातील शासकीय आणि खासगी कंपनीत आणि कार्यालयात काम करणाऱ्या सर्व नोकरदार महिलांच्या सुरक्षेबाबत समस्या बडीकॉप माध्यमातून सोडवण्यात येणार आहे. प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये १०० ते १५० महिलांचा समावेश असणार आहे. याबाबत पोलीस स्टेशन स्तरावर ग्रुप तयार करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या असून त्याबाबतची माहिती तीन ते चार दिवसात एकत्रित केली जाणार आहे.
– पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम

बडीकाॅप योजनेतील संगणकीय प्रणाली तसेच व्यवस्थाही जवळपास बंद पडली होती. महिलांच्या तक्रारींची निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समाजमाध्यमावर बडीकाॅपन नावाने समुह सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समुहात नोकरदार महिलांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांसाठी एक मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. एखाद्या महिलेने मदत मागितल्यास तिला त्वरीत सहाय्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाल सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक अर्चना कटके या योजनेचे काम पाहणार आहेत.

नाेकरदार महिलांच्या सुरक्षेस या योजनेअंतर्गत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलेशी एखाद्याने गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यास त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे कामकाज सुरू राहणार आहे. शासकीय कार्यालये, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच खासगी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात नियमित गस्त घालण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर नाेकरदार महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी समाजमाध्यमावर एक समुह तयार करण्यात येणार आहे. या समुहात संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय, खासगी कंपनीतील कर्मचारी महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.

See also  पुणेकरांनी वाहिली रान गव्याला श्रद्धांजली.