पाषाण :
पुणे परिसरातील टेकड्या वाचवणे गरजेचे आहे, टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून बरेच ठिकाणी टेकड्यांचे लचके तोडण्याचे काम देखील होत आहे. परंतु बाणेर येथील तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियाने केलेल्या वृक्षारोपण कामाचे कौतुक करून खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, टेकड्या वाचविण्यासाठी झटणाऱ्या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम वसुंधरा अभियाने करावे. व बाणेर टेकडी प्रमाणेच सर्व टेकड्यांचे जतन केले जावे.
बाणेर येथे वसुंधरा अभियान मार्फत बांधण्यात आलेल्या २८००० लिटरच्या ३० व्या टाकीचा उद्घाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या की, पुण्यातील नव्हे तर सर्वच ठिकाणच्या टेकड्या वाचवल्या पाहिजे, त्याची लचकेतोड थांबवायला हवी, तसेच तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियानने तयार केलेली जैवविविधता मानवनिर्मित जंगले प्रत्येक टेकडीवर व्हावी.
गेली १६ वर्षे अथक लोकसहभागातून निसर्ग सेवा करून वसुंधरा अभियान ग्रुपने आजवर विविध जातींची ४० हजार देशी झाडे लावून ती जपली आहेत. त्यात सलग समतल चर करून लावलेली असंख्य झाडे आहेत, तर मियावाकी पद्धत वापरून उभे केलेले मानवनिर्मित जंगलही आहे. देवराई, नक्षत्रवन, वाटिका असे विविध २० प्रकल्प असून पाणी आडवा, पाणी जिरवा अंतर्गत ५० हून अधिक छोटे-मोठे बंधारेही तयार केले आहेत.
मॉर्निंग ग्रुप पाषाण, युथ कनेक्ट पुणे, वैद्यकीय क्षेत्रातील बी. एम.ए. ग्रुप, डेंटल असोसिएशन, एसकेपी कॅम्पस प्राचार्य शांताराम पोखरकर, औंध आयटीआय प्राचार्य विकास टेके, अभिनव शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका योगिता बहिरट, विद्यांचलच्या श्वेता मुरकुटे, सायकलिस्ट ग्रुप, पर्यावरण तज्ज्ञ धनंजय शेडबळे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटकर, पुढारी चे पत्रकार मोहसीन शेख, सकाळ चे बाबा तारे, प्रभात चे अभिराज भडकवाड, लोकमत चे रामदास दातार, भालेराव सर तसेच निसर्ग संवर्धन क्षेत्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा वसुंधरा अभियान कडून सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
या उद्घाटन प्रसंगी पर्यावरण प्रेमी तसेच वसुंधरा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.