नवी दिल्ली :
महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली. आता गुरुवारी 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता फैसला हा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता गुरुवारी पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत होती. आज न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घटनापीठासमोर होईल असे स्पष्ट केले. त्यामुळे यातील सस्पेन्स संपला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होईल, असे आज सरन्यायाधीश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी सांगितले. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आम्हाला एक आठवडा हवा असल्याचे न्यायालयापुढे सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोगाने या प्रकरणी निर्णय घ्यायचा आहे. कृपया निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या निर्णयाची प्रतीक्षा करुया. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देश त्यांनी दिले.
या प्रकरणाची सुनावणी आता 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या मुद्द्यावर दुपारी 3 वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
यासंदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन आणि पुरवणी कार्यसूचीत सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीबाबतही रात्री उशिरापर्यंत अनिश्चितता होती.
दरम्यान, सकाळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यासंदर्भातील याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी हा विषय कार्यसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास यावर सुनावणी घेण्यात आली.