नवी दिल्ली :
बुलेट ट्रेनप्रमाणेच धावणारी सेमी-हायस्पीड ट्रेन वंदे भारतचे अपग्रेडेड व्हर्जन ‘वंदे भारत २’ लाँच करण्याची तयारी सुरू आहे.
तसेच मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी बनावटीची आहे. प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव आणि अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी उत्तम सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे या ट्रेनची सेवा कधीपासून मिळणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. अखेर त्याचा मुहूर्त ठरला आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून ही ट्रेन धावणार आहे.
वंदे भारत ट्रेनची अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे. अत्यंत जलद धावणारी म्हणून तिची ख्याती आहे. अवघ्या अडीच तासात आता अहमदाबाद-मुंबई अंतर पूर्ण करता येणार आहे. रेल्वेने आतापर्यंत दोन मार्गांवर ही सेवा सुरू केली आहे. १५ ऑगस्टला तिचे उदघाटन झाले.
सर्वात पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. त्यानंतर दिल्ली ते कटरा या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली गेली. आणि आता तिसरी ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवली गेली. अधिकचा वेग १८० किलोमीटर प्रति तास असा आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे अधिकारी सक्सेना यांनी या वृत्ताला दुसरा देत अहमदाबाद मुंबई अति जलद वंदे भारत ट्रेनची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन वंदे भारत २ ही ट्रेन येत्या ३० सप्टेंबरपासून अहमदाबादहून मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नव्या वंदे भारतच्या प्रवासी भाड्याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी प्रवाशांना २३४९ रुपये मूळ भाडे द्यावे लागेल, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. तर, चेअर कारचे मूळ भाडे ११४४ रुपये आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.
नवीन वंदे भारत मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दोन स्थानकांवर थांबेल. यामुळे देशातील दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. रेल्वेने निश्चित केलेल्या भाड्यात वंदे भारत प्रवाशांना शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांच्या मूळ भाड्याच्या १.४ पट भरावे लागणार आहे. अहमदाबाद ते सुरत या वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासचे मूळ भाडे १३१२ रुपये आणि चेअर कारसाठी ६३४ रुपये असणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सुरत ते मुंबईचे मूळ भाडे १५२२ रुपये आणि चेअर कारचे ७३९ रुपये असेल. आयसीएफ चेन्नईने डिझाइन केलेले नवीन वंदे भारत कमाल १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. सध्या वंदे भारत एक्सप्रेस देशातील दोन मार्गांवर धावते. यामध्ये पहिला मार्ग नवी दिल्ली ते कटरा आणि दुसरा मार्ग नवी दिल्ली ते वाराणसी असा आहे.