पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण संपन्न

0
slider_4552

पुणे :

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ४१ कोटी रुपये खर्चातून उभारलेला ४७० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पूल वाहतूकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे.

पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून श्री. पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे. मेट्रो, सर्व भागात २४ तास समप्रमाण पाणी पुरवठा, जायका प्रकल्प आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी. या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

See also  स्वच्छतादूत आणि उद्योजक महिलांचा सन्मान : राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ आणि बालेवाडी वूमन्स क्लबचा उपक्रम

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविकात पुलाबाबत माहिती दिली. हा पूल ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
उड्डाणपुलाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तांत्रिक कारणामुळ त्यांना सहभागी होता आले नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंत्री श्री. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक किरण दगडे, दिपक पोटे, दिलिप वेडे पाटील, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, सचिन दळवी, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम सुतार, नितीन रणवरे, सुनील माने, विशाल विधाते, नारायण चांदेरे, अनिल  ससार, आदी उपस्थित होते.