लंडन :
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने संघातील सिनीअर गोलंदाज झुलन गोस्वामीला विजयी निरोप दिला आहे. आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळणाऱ्या झुलन गोस्वामीला भारतीय संघाने इंग्लंडवर १६ धावांनी मात करत मोठं गिफ्ट दिलं आहे.







या विजयासह भारतीय महिलांनी वन-डे सामन्यांची मालिका ३-० ने जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
टी-२० मालिका २-१ ने गमावल्यानंतर वन-डे मालिकेत भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली. पहिले दोन सामने जिंकत भारतीय महिलांनी मालिकेत बाजी मारली होती. अखेरचा सामना झुलन गोस्वामीचा कारकिर्दीतला शेवटचा सामना असल्यामुळे संपूर्ण संघासाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण बनला होता. परंतु फलंदाजीतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय महिला संघ १६९ धावांपर्यंतच मजल मारु शकला. परंतु गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडला अखेरच्या सामन्यातही विजयाची संधी न देता झुलन गोस्वामीला विजयी निरोप दिला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजी अखेरच्या सामन्यात पुरती कोलमडलेली पहायला मिळाली. केट क्रॉसने भारताच्या डावाला खिंडार पाडलं. शफाली वर्मा, यात्सिका भाटीया, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल या सर्व महत्वाच्या फलंदाज माघारी परतल्या. ४ बाद २९ अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाला स्मृती मंधाना आणि दिप्ती शर्मा यांनी सावरलं.
ही जोडी मैदानात तग धरतेय असं वाटत असतानाच केट क्रॉसने स्मृती मंधानालाही माघारी धाडलं. स्मृतीने ७९ बॉलमध्ये ५ चौकार लगावत ५० धावा केल्या. स्मृती माघारी परतल्यानंतर डी. हेमलताही लगेच बाद झाली. यानंतर पुजा वस्त्राकरने हेमलताला चांगली साथ दिली. पुजा आणि हेमलताच्या भागीदारीमुळे भारतीय महिलांनी आव्हानात्मक धावसंख्या गाठली. पुजा वस्त्राकर बाद झाल्यानंतर दिप्ती शर्माने भारताला १६९ धावांपर्यंत मजल मारुन दिली. दिप्ती शर्मा ६८ धावांवर नाबाद राहिली. इंग्लंडकडून केट क्रॉसने ४, फ्रेया केंप-सोफी एस्कलस्टोनने प्रत्येकी २-२ तर फ्रेया डेव्हीस आणि चार्ली डीनने १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या महिलांनी सावध सुरुवात केली. टॅमी बेमाऊंट आणि एमा लँब जोडीने काही सुरेख फटके खेळले. रेणुका सिंगने एमा लँबला माघारी धाडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर इंग्लंडच्या डावाला लागलेली गळती लागली. ७ बाद ६५ अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या इंग्लंडच्या संघाला कर्णधार एमी जोन्सनने सावरलं. अखेरच्या फळीत एमी जोन्ससोबतच चार्ली डीनने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं.
कर्णधार जोन्स माघारी परतल्यानंतर चार्ली डीनने अखेरच्या फळीतील फलंदाजांना घेऊन इंग्लंडला विजयासाठीचं आव्हान २० धावांच्या आत आणून ठेवलं. परंतू दिप्ती शर्माने चार्ली डीनला चतुराईने रनआऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.








