नवी दिल्ली :
1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात अखेर 5G सेवा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आज 5G नेटवर्क लाँच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त जिओचे प्रमुख मुकेश अंबानी, एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल, आणि वोडाफोन आयडियाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
8 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया ची मोहीम सुरू केली होती. आता 5G नेटवर्क लाँच झाल्यामुळे या डिजिटल इंडियाच्या मोहिमेला नव्याने गती मिळणार.
डिजिटल इंडिया मोहीम
भारतातील ग्रामीण आणि शहरी भागांना हाय स्पीड नेटवर्कद्वारे जोडण्यासाठी डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. शहरांसोबत ग्रामीण भागांना स्मार्ट आणि डिजिटल बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी ही मोहीम सुरू केली होती. डिजिटल इंडिया मोहिमेचा मुख्य उद्देश होता भारताला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे.
डिजिटल इंडियाची मोहीम यशस्वी
देशात 5G नेटवर्कचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा दिवस 21 व्या शतकातील एक ऐतिहासिक दिवस आहे. 5G नेटवर्क टेक्निकल क्षेत्रात बदल घडवून आणेल. 5G नेटवर्कमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लोक आता सहज जोडले जाऊ शकतात. डिजिटल इंडिया मोहिमेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकांना वाटते की डिजिटल इंडिया ही एक फक्त सरकारी योजना आहे, ही एक फक्त सरकारी योजना नसून देशाच्या विकासासाठी केले गेलेले एक मोठे व्हिजन आहे. डिजिटल इंडिया मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे आणि लोकांना तंत्रज्ञानाशी जोडणे हे आहे.