पुणे :
समाजासाठी आरोग्य शिक्षण, संशोधन आणि रोग निदान त्रिसूत्री महत्वाची असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब व कॅन्सर रिसर्च सेंटरचे उद्घाटन, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या समवेत परस्पर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले व ‘मानस’ अॅपचा प्रारंभ विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राज्यपाल यांच्या समवेत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षण आणि संशोधन या पायाभूत संकल्पना आहेत. विविध रोग व त्यावर उपचार शोधण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. संशोधन ही तपस्या आहे. विद्यापीठाच्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून विविध चाचण्या होणार असून त्याचा समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. कॅन्सर आजारावर अन्य पध्दतीत उपचार करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. दूर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याची माहिती व प्रसार होणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार होणे गरजेचे आहे. जेनेटिक व मॉलीक्युलर बायोलॉजी क्षेत्र यामध्ये संशोधन कार्याला मोठा वाव आहे. विद्यापीठाने सुरु केलेल्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून संशोधनाला बळ मिळणार असून त्याचा विस्तार होणे क्रमप्राप्त आहे. मूलभूत संशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहचण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.
हा एक करार
आरोग्य विद्यापीठ आणि नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) यांचा सामंजस्य करारातंर्गत संशोधनाविषयी क्षमता वाढवणे, प्रयोगशाळा सेवा आणि औषध प्रतिकार अभ्यास आदी क्षेत्रांत कार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातून सामर्थ्य प्राप्त करते हे मुख्य उद्दिष्ट आहे. संशोधन उपक्रमांना तज्ज्ञ सल्लागार मार्गदर्शन करतील तसेच विविध विषयांतील नामवंत शास्त्रज्ञांचा समावेश यामध्ये असणार आहे. नवीन संकल्पनेपासून ते अंमलबजावणी आणि निकालांच्या अंतिम प्रसारापर्यंत एकत्रित सहभाग यात असणार असल्याने हा सामंजस्य शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी करार महत्वपूर्ण आहे.
आरोग्य विद्यापीठ आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) यांचा सामंजस्य करारातंर्गत कर्करोग, चयापचय विकार, संसर्गजन्य रोग आणि औषध यासारख्या महत्त्वाच्या आरोग्य समस्यांवर संशोधन करण्यात येणार आहे. विद्यापीठासमवेत सामंजस्य करारातून संशोधन उपक्रमास चालना मिळेल. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी मानले व पुणे विभागीय रिजनल सेंटरच्या पुढील उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, भारतीय औषध संशोधन संस्थेचे पदाधिकारी श्री. अक्कलकोटकर, डॉ. जेठाळे, डॉ. शेंडे, डॉ. काळे, डॉ. घनःशाम मर्दा, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. सुरेश पाटणकर, कॅन्सर जेनेटिक रिसर्चच्या चेअर प्रोफेसर डॉ. अनुराधा चौगुले, श्रीमती एकबोटे, डॉ. वाणी, डॉ. कल्पना श्रीवास्तव, डॉ. शिला गोडबोले, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर, ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद, अॅड. संदीप कुलकर्णी, विविध परिषदेचे सदस्य, व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.