पुणे :
इतिहासाची माहिती नसलेल्या लोकांनी काहीतरी बोलून समाजात गैरसमज निर्माण करू नयेत, रोज नवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत, असा टोला खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संबंधित नेत्यांना लगावला.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात मेळावा झाला. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे ,अजय भोसले, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , मावळचे खासदार श्रीरंग बारणे ,सुधीर कुरूमकर, संजय अगरवाल यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.
गेल्या पाच महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वेगाने काम होत आहे. सामान्य माणासाशी संबंधित अनेक विषय या काळात मार्गी लावण्यात यश मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. याउलट आधीच्या सरकारच्या काळात कामे होत नव्हती. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची दारे कायम बंद होती. ती आता केवळ नेत्यांसाठीच नव्हे तर सामान्य माणसासाठी देखील खुली झाली आहेत. लोकांना दोन सरकारमधील फरक लक्षात येत असल्याचा दावा, खासदार डॉ. शिंदे यांनी केला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना काही लोक दुसऱ्यांची सकाळ रोज खराब करण्याचा उद्योग करीत असतात. मात्र, अशा लोकांकडे लक्ष न देता आपण आपले काम करीत राहिले पाहिजे, असे खासदार शिंदे म्हणाले. कोणताही उद्योग नसलेले लोक रोज नवे काहीतरी बोलत राहतात. मुळात राज्यातील सरकारचे काम उत्तमरित्या सुरू असल्याने काहीजणांच्या पोटात गोळा आला आहे. त्यातून रोज नवी काहीतरी टीका करून सरकारच्या कामगिरीविषयी साशंकता निर्माण करण्याचा केवीलवाणा प्रयत्न ही मंडळी करीत असल्याचे ते म्हणाले.