ढाका :
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे सामना बुधवारी (7 डिसेंबर) खेळला गेला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने अवघ्या एका विकेटने पराभव स्वीकला होता.
मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या वनडेत विजय मिळवणे महत्वाचे होते. मालिकेतील या निर्णायक सामन्यात विजयासाठी दोन्ही संघांना शेवटच्या षटकापर्यंत प्रयत्न केले. अखेरीस विजयाची माळ बांगलादेशच्या गळ्यात पडली आणि त्यांनी मालिका देखील नावावर केली. भारताला मालिकेतील या दुसऱ्या वनडेत 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघाचा कर्णदार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताला चेंडू लागल्यामुळे मैदानातून बाहेर जावे लागले होते. मात्र फलंदाजी करण्यासाठी मात्र त्याने पुनरागमन केले. रोहित काही तास मैदानाच्या बाहेर थांबल्यानंतर भारतासाठी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सामन्याच्या शेवटच्या षटकात चाहत्यांना रोहित शर्मा विरुद्ध मुस्तफिजूर रहमान असा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. विजयासाठी भारताला शेवटच्या दोन चेंडूंवर 12 धावांची आवश्यकता होती. रोहितने पाचव्या चेंडूवर षटकार कुटला, मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मारता आला नाही.
तत्पूर्वी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 271 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरा भारतीय संघ 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 266 धावा करू शकला. कर्णधार रोहितचे संघासाठी शेवटच्या षटकांमध्ये येऊन नाबाद 51 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. रोहितचा स्ट्राईक रेट 182.14 चा होता आणि या धावा करण्यासाठी त्याने 28 चेंडू खेळले. असे असले तरी, कर्णधार भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. परिणामी बांगलादेशने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी देखील घेतली.
भारताला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजीले आलेल्या बांगलादेशचे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, सहाव्या क्रमांकावर महमुदुल्लाह (77) आणि मेहिदी हसन (100*) महत्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या उंचावली. प्रत्युत्तरा भारतीय संघाचे सलामीवीर विराट कोहली आणि शिखर धवन अनुक्रमे 5 आणि 8 धावा करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर याने मात्र 82 धावांची मोठी खेळी केली. त्यानंतर अक्षर पटेल (56) आणि शेवटच्या षटकांमध्ये रोहित शर्मा (51*) यांनी अर्धसतकीय योगदान दिले.
गोलंदाजी विभागाचे प्रदर्शन पाहिले, तर भारतासाठी वॉशिंगटन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज संघाला महागात पडला असला, तरी त्याने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. सिराजने 10 षटकांमध्ये तब्बल 73 धावा खर्च केल्या. युवा उमरान मलिकचे प्रदर्शन देखील समाधानकारक राहिले. उमरानने 58 धावा कर्च केल्या आणि दोन विकेट्स नावावर केल्या. बांगलादेशसाठी उबादत हुसैन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे शाकिब अल हसन आणि मेहदी सहन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. उभय संघांतील तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी (10 डिसेंबर) रोजी खेळला जाणार आहे.