नांदेड :
राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोंबड्या, कावळे, पोपट मृतावस्थेत आढळ्याचं समोर आलं होतं. आता नांदेडमध्ये शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या मधमाशांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी पसरल्याने नागरिक घाबरून गेले आहेत.
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक घाबरून गेले आहेत. जंगलातील मधमाशा शहरात मृत्यूमुखी पडल्याने या मधमाशांनाही बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती की काय?
असा प्रश्न केला जात आहे. शेकडो मधमाशा मृत्यूमुखी पडल्याचं आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. या विभागाची टीम घटनास्थळी येणार असून पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, चिंचोर्डीतील तीन पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या शंभर कोंबड्या दगावल्या आहेत. या कोंबड्यांना दफन करण्यात आलं असून त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली आहे.