बालेवाडी :
पुणे महापालिका देशातील एकमेव महापालिका आहे जी प्रत्येक ११ डिसेंबरला पादचारी दिवस साजरा करते. पादचाऱ्यांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करणे असा यामागचा उद्देश आहे. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन, बालेवाडी येथील सर्व सोसायटीचे प्रतिनिधित्व करणारी संस्थेने पादचारी दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
बालेवाडीत अनेक रस्ते अपुरे असून पादचारी मार्गाचा अभाव आहे. पादचारी मार्गावर अडथळे असून ते अस्वच्छ आहेत. फूटपाथ नसल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना वेगाने धावणारे वाहनांचा सामना करावा लागतो. काही रस्त्यांवर दिवे नसल्याने रात्री सुरक्षेचा प्रश्न जाणवतो. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, पायी चालण्यायोग्य पादचारी मार्ग, अपुरे रस्ते लवकर पुर्ण व्हावे अशा मागण्यांसाठी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे सदस्य व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बालेवाडीतील दोनशे पेक्षा जास्त नागरिक दसरा चौक, बालेवाडी येथे सकाळी दहा वाजता एकत्र आले. हातात आपल्या मागण्यांचे फलक घेऊन नागरिकांनी घोषणा देत आपल्या मागण्या व व्यथा मांडल्या.
नागरिकांनी वाहन चालवताना जेष्ठ नागरिक व विद्यार्थी यांची काळजी घ्यावी, फूटपाथवर वाहने लाऊ नये, रस्ते स्वच्छ ठेवावे, पाळीव प्राणी मालकांनी रस्ते खच्छ ठेवावे असे जनजागृती फलक व घोषणा सर्वांनी दिल्या.
बालेवाडीकरांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी आणि जनतेत ‘पादचारी हक्क आणि कर्तव्य’ बद्दल जनजागृती व्हावी म्हणून बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी सांगितले की, फेडरेशनला प्रशासनाच्या अडचणींची जाणीव आहे परंतु सर्व घटकांना बरोबर घेऊन अपुर्या रस्त्यांचे काम पुर्ण व्हावे आणि नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे अशी मागणी आम्ही याप्रसंगी करीत आहोत.
या कार्यक्रमासाठी अमेय जगताप, अशोक नवाल, मोरेश्वर बालवडकर, एड. माशाळकर, एड. तारे, अस्मिता करंदीकर, शुभांगी चपाटे, शकिल सलाटी, गणपतराव बालवडकर, डि डि सिंग व जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. राहूल बालवडकर, शुभम बालवडकर हे प्रतिष्ठित नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.