ढाका :
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (22 डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झाला. बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत.
भारताच्या भेधक गोलंदाजीपुठे बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 227 धावांवर गुंडाळला गेला. उमेस यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत विरोधकांना स्वस्तात गुंडाळले.
बांगलादेशसाठी मोमिनुल हक याने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. मोमिनुल हकव्यतिरिक्त बांगलादेशचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार चार विकेट्स घेतल्या. उमेशने या चार विकेट्स घेताना 15 षटकांमध्ये 25 धावा खर्च केल्या, तर अश्विनने 21.5 षटकात 71 धावा खर्च करून या विकेट्स घेतल्या.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. अशात आता त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून देखील माघार घेतली आहे. केएल राहुल पहिल्या कसोटीनंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. राहुलच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला असून आता दुसऱ्या सामन्यात देखील अशाच प्रदर्शनाच्या अपेक्षेत आहे. संघाने सामना जिंकण्याच्या दृष्टीने पहिल्या डावात चांगली सुरुवात देखील केली आहे.
उभय संघांतील या सामन्यात राहुलने नाणेफेक गमावली जरी असली, तरी संघाला सुरुवात मात्र अप्रतिम मिळाली आहे. पहिल्या डावात अश्विन आणि उमेश यादवव्यतिरिक्त जयदेव उनाडकट याने देखील 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. उनाडकट याने भारतासाठी 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पण मागच्या 12 वर्षांमध्ये त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर गुरुवारी त्याने बांगलादेशविरुद्ध संघात पुनरागमन केले आणि महत्वाच्या दोन विकेट्सही घेतल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 19 धावा करू शकला. भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात कर्णधार केएल राहुल आणि शुबमन गिल मैदानात आले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुलने 30 चेंडूत 3 धावा केल्या. तर शुबमन गिलने 20 चेंडूत 13 धावा केल्या.