मुंबई :
सुर्यकुमार यादव याचा झंजावात आणि गोलंदाजांचे भेदक प्रदर्शन याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (12 मे) गुजरात टायटन्स वर विजय मिळवला.
गुजरातला या सामन्यात 27 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राशिद खानच्या वादळी खेळीमुळे गुजरातने 20 षटके खेळून काठली. मुंबईकडून विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य गुजरात टायटन्सला मिळाले होते.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक गमवल्या नंतर परिणामी मुंबईने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांमध्ये 218 धावा कुटल्या. सूर्यकुमार यादव याने अवघ्या 49 चेंडूत नाबाद 103 धावा कुटल्या. आयपीएल इतिहासातील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. या धावा करण्यासाठी सूर्यकुमारने 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याव्यतिरिक्त ईशान किशन आणि विष्णू विनोद यांनी अनुक्रमे 31 आणि 30 धावा केल्या.
मुंबईकडून विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य मिळाले असताना गुजरातची वरची फळी अवघ्या 26 धावांवर बाद झाली. रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे 2, 4 आणि 6 धावा करून विकेट्स गमावल्या. गुजरातसाठी पाचव्या क्रमांकावर आलेला डेविड मिलर याने 41, अष्टपैलू राशिद खान याने 32 चेंडूत सर्वाधिक 79 धावा केल्या. यात तीन चौकार आणि तब्बल 10 षटकारांचा समावेश होता. तत्पूर्वी राशिदने गोलंदाजी
करताना चार षटकात 30 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या. असे असले तरी, मुंबईच्या संघिक खेळीपुढे राशिदची एकाकी झुंज अपयशी ठरली.
गुजरातने 13.2 षटकांमध्ये आपली आठवी विकेट गमावली होती. अशात शेवटच्या दोन विकेट्स देखील गुजरातचे फलंदाज लवकरच गमावतील असे वाटत होते. मात्र, यावेळी राशिद खान खेळपट्टीवर होता. राशिद आणि अलझारी जोसेफ यांनी शेवटच्या चेंडूवर्यंत खेळपट्टी सोडली नाही. जोसेफने 12 चेंडूत नाबाद 7 धावा केल्या. राशिदच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसत होते, कारण खेळपट्टीवर अनेक वेळा त्याला धावताना आणि उभा राहताना त्रास होत असल्याचे दिसले. तरीदेखील त्याने आपला धमाकेदार खेळ सुरूच ठेवला. शेवटच्या षटकात राशिदने कुमार कार्तिकेयला तीन षटकार मारले आणि पराभवाचे अंतर कमी केले.
मुंबईच्या गोलंदाजी आक्रमानाचा विचार केला, तर आकाश मधवाल याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. जेसन बेहरनडॉर्फ याने एक विकेट नावावर केली. या विजयानंतर गुणतालिकेत मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. 11 पैकी 7 सामने मुंबईने जिंकले असून संघाकडे एकूण 14 गुण आहेत. मुंबईने जर लीग स्टेजणधील अजून एक सामना जिंकला, तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाहीये.