नवी दिल्ली :
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे भारतीय वायुसेनेने ‘मिग-21’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानात ‘मिग-21’ कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे आता हवाई दलाने ‘मिग-21’ विमाने ‘ग्राउंड’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अपघाताची चौकशी सुरू आहे. वायुसेनेचे चौकशी पथक 8 मे रोजी झालेल्या अपघाताच्या कारणांचा शोध घेतेय. ही चौकशी सुरू असेपर्यंत मिग-21चे विमानाचे तिन्ही स्क्वाड्रन उडणार नाहीत. मिग प्रकारांचा पहिला ताफा 1963 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आला होता आणि त्यानंतरच्या दशकात भारताने 700 हून अधिक मिग-व्हेरियंट विमाने खरेदी केली होती. मिग हे भारतीय वायुसेनेचे सर्वात जुने फायटर जेट फ्लीट आहे. त्याच्या जागी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत 48 हजार कोटींचा करार केला आहे.
भारतीय वायु दल 114 लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. 1960च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून आतापर्यंत 400 हून अधिक वेळा मिग-21 विमानांचे अपघात झाले आहेत. भारतीय वायुसेनेत फक्त तीन मिग-21 स्क्वॉड्रन्स कार्यरत आहेत आणि त्या सर्व 2025 च्या सुरुवातीस टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. राजस्थानमध्ये क्रॅश झालेले हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते तेव्हा ते कोसळले. या अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे.आयएएफकडे तीन मिग-21 बायसन प्रकारांसह 31 लढाऊ विमान स्क्वाड्रन्स आहेत.