मलेशिया :
भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयने मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या वांग हाँग यांगचा 21-19, 13-21, 21-18 असा तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत पराभव करुन आपले पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले आहे.
भारतासाठी पुरुष एकेरीत हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
एचएस प्रणॉयने इतिहास रचला
दरम्यान, या विजयासह एचएस प्रणॉयने सहा वर्षांहून अधिक काळातील पहिले पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी, त्याने 2017 यूएस ओपनमध्ये विजेतेपद जिंकले होते, जे BWF ग्रँड प्रिक्सचा एक भाग होता, जो सध्याच्या BWF वर्ल्ड टूरचा पूर्ववर्ती होता.
दुसरीकडे, प्रणॉय आणि यांग हे वर्षातील आपला पहिला अंतिम सामना खेळताना पहिल्या गेमच्या सुरुवातीलाच आमनेसामने आले. जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतसे दोन्ही खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी झुंज दिली. 16-16 अशी स्कोअरची बरोबरी असताना, प्रणॉयने आक्रमकता धारण केली आणि सामन्यातील पहिला गेम जिंकला.
जबरदस्त सामना झाला
प्रणॉय (HS Prannoy) सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये लय राखण्यात अपयशी ठरला आणि मध्यंतरापर्यंत चीनच्या खेळाडूने 11-9 अशी आघाडी घेतली. नंतर, त्याने सलग सहा गुण जिंकले. अशारितीने दुसरा गेम जिंकून सामना निर्णायक ठरला. शेवटच्या गेममध्ये, प्रणॉयने संथ सुरुवात केली. सुरुवातीला 2-5 ने तो पिछाडीवर पडला, परंतु 9-9 अशी बरोबरी साधत त्याने जोरदार पुनरागमन केले. 18-ऑल असताना, प्रणॉयने तीन बॅक-टू-बॅक गुणांसह सामना संपवला आणि BWF सुपर 500 स्पर्धा जिंकली.