पिंपरी :
मागील कालावधीत महापालिकेच्या अनेक कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. सर्व कामांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात येईल. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. लवकरच सायंकाळी सातच्या नंतर आयुक्त शेखर सिंह यांना घेवून बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई, डूडूळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील ११९० सदनिकांच्या प्रकल्पाच्या कामासाठी १४२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र स्थानिक एकाही ठेकेदाराने या निविदेत भाग घेतला नाही. या निविदेला केवळ दोन निविदा धारकांनी भाग घेतला. ही निविदा तब्बल २५ कोटी रुपये जादा दरांनी म्हणजेच तब्बल १६७ कोटी रुपयांची मंजूर करण्यात आली आहे.
टेल्को रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ९० कोटी व ७० कोटी अशा दोन निविदा मागविण्यात आल्या आहेत. याही निविदेत रिंग झालेली आहे. निविदेचे पहिले पाकीट उघडण्यात आले आहे. भामा आसखेड धरणाजवळ अशुध्द जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल बांधणे व इतर कामे करण्यासाठी १२० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली.
प्रत्यक्षात मात्र देखभाल दुरुस्तीसह तब्बल १८० कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली, अशा विविध कामांबाबत तक्रारी आल्या आहेत. आयुक्तांना काही प्रश्न दिले आहेत. त्यांना घेवून बसणार आहे. काही कामांबाबत आमचे पदाधिकारी न्यायालयात गेले आहेत. सर्व तक्रारींची माहिती घेवून तथ्य आहे की नाही याची चौकशी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.