इराण :
इराण मधील महिलांच्या विविध प्रश्नांवर लढा उभारणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी 351 लोकांची नावे देण्यात आली होती. त्यातून नॉर्वे नोबेल समितीने नर्गिस मोहम्मदी यांच्या नावाची घोषणा केली आहे.




स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिले जातात. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील मान्यवरांना दरवर्षी नोबेल फाऊंडेशनकडून नोबेल पुरस्कार दिला जातो. मागील वर्षी बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संघटनांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
सन 1901 मध्ये फ्रेडरिक पासी यांना शांतेतचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. भारताच्या मदर तेरेसा आणि कैलाश सत्यार्थी यांना देखील शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी जगभरातून 259 व्यक्ती आणि 92 संस्थांची नावे नोबेल समितीकडे पाठवण्यात आली होती. त्यातून नर्गिस मोहम्मदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
नर्सिग मोहम्मदी यांनी इराण मधील महिला अत्याचाराविरुद्ध लढा उभारला. त्याबद्दल इराणच्या सरकारने त्यांना कारागृहात ठेवले आहे. 51 वर्षीय नर्गिस यांना 31 वर्षांचा कारावास आणि 154 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मदी यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आवाज उठवला होता. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.








