पुण्यात कोणतेही गँगवॉर होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

0
slider_4552

पुणे :

पुण्यात कोणतेही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या त्यांच्याच साथीदाराने केलेली आहे. कोणीही असो त्याचा बंदोबस्त या शासनामध्ये केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

पिंपरी महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित केलेल्या ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य केवळ मुर्खपणाचे आहे. प्रसिध्दी मिळविण्याकरिता ‘बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ’ असे एक हिंदीतील वाक्य आहे. अशाप्रकारे जितेंद्र आव्हाड करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरे म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. बहुजन, अभिजन, दलितांचे, आदिवासी असा कोण आहे या देशात ज्यांचे प्रभू श्रीराम नाहीत. उगाचच मग ते शाकाहारी, मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचविले जाते. वारकरी, माळकरी, धारकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजाचे आहेत. हे सगळे प्रभू श्रीराम यांना मानतात. यातील सर्व लोक शाकाहारी आहेत. लक्ष्मण जगताप असते तर त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा साजरा केला असता. रामराज्याचे आपले स्वप्न आहे. शोषित, पीडितांना सुविधा मिळणे म्हणजे रामराज्य आहे.

आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविली आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासात जगताप यांचा सहभाग राहिला. सामान्यांच्या गरजा ओळखून उपक्रम राबवत होते. त्यांच्या सारखे व्यक्तीमत्व नसणे याचे दुःख आहे. त्यांचा वारसा जपणे, पुढे चालविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

See also  पुण्यात परत एल्गार परिषद आयोजन?