दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार – अभिनेता आमिर खान

0
slider_4552

‘फार्मर कप 2023’ पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडी येथे संपन्न

पुणे :

येत्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार आहे. या माध्यमातून शेकडो शेतकरी – उद्योजक घडवायचे आहेत, असे प्रतिपादन पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी केले.

फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2023’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे हे यावेळी प्रमुख पाहुणे होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, सीईओ रीना दत्ता, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ तसेच प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मंजिरी फडणीस इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

फार्मर कपमधील सहभागी शेतकरी गटांना मार्गदर्शन करणारे शास्त्रज्ञ, अहमदनगर येथील स्नेहालय आणि अंमळनेर येथील दीपस्तंभ संस्था तसेच सह्याद्री फार्म, से ट्रीज संस्था, उमेद संस्था, पोकरा संस्था, बजाज ऑटो लिमिटेड, एबीपी माझाचे राजीव खांडेकर, राज्यातील विविध कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ डी. एल. मोहिते सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्यातील 1 जिल्ह्यांतील 39 तालुक्यांमधील 3000 गटांनी या स्पर्धेत भाग घेतला. यातील 21 गटांची अंतिम फेरीची निवड करण्यात आली. त्यातून कुंभारगाव ता. करमाळा जि. सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना 15 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कर देण्यात आला. घोडेगाव ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथील आई जिजाई महिला शेतकरी गट आणि वारंगा तर्फ नांदापुर ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील उन्नती शेतकरी गट यांना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून आला. सन्मानचिन्ह आणि रोख 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेरेवाडी ता. आटपाडी जिल्हा सांगली येथील प्रगती महिला शेतकरी गट आणि सौंदे ता. करमाळा जि. सोलापूर येथील रॉयल फार्मर शेती गट यांना तिसरा पुरस्कार विभागून देण्यात आला. 2 लाख 50 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

See also  17 नंबर अर्ज भरण्यासाठी अतिविलंब शुल्कासह 20 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ

आमिर खान म्हणाले, “पानी फाउंडेशनला जवळपास 10 वर्षे होत आहेत. सुरुवातीला जलसंधारणावर काम केले. तेव्हा महाराष्ट्रातील गावांनी हे दाखवून दिले की जगात काहीही अशक्य नाही. मात्र आता शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याची गरज आहे हे कोविडच्या काळात लक्षात आले. तेव्हा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने गटशेतीकडे वळलो. आता संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार आहे. दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचे लक्ष्य फाउंडेशनने बाळगले आहे. संपूर्ण महाराष्ट्र गटशेती करेल आणि आपण यश गाठू, तो दिवस दूर नाही.”

सह्याद्री ऍग्रोचे विलास शिंदे म्हणाले, “गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे हे केवळ एकीच्या माध्यमातून शक्य आहे. हे शेतकरी केवळ आपला नव्हे तर देशाचा प्रश्न सोडवत आहेत. देशातील विविध आंदोलने ही शेतीच्या प्रश्नांमुळे होत आहेत. मात्र जे सरकार करू शकत नाही ते शेतकरी करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. शेतकरी हा अन्नदाता किंवा बळीराजा आहे तसेच तो व्यावसायिक आहे. सर्वात अवघड व्यवसाय शेतकरी करतात. आता आपली स्पर्धा ही जागतिक पातळीवर आहे. गतशेतीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो.”

*महिलांचा मोठा सहभाग खूप आनंददायक : देवेंद्र फडणवीस*

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष व्हिडिओ संदेश पाठवून फार्मर कपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. फार्मर कापच्या निमित्ताने सरकारी योजनांना चळवळीचे रूप आले आहे. फार्मर कपमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे याचा मला आनंद आहे. या महिलांसाठी फाउंडेशनने विशेष पुरस्कार ठेवले आहेत ही कौतुकाची बाब आहे.”

*हवामान बदल ही संकट आणि संधी – सत्यजित भटकळ*

सत्याजित भटकळ म्हणाले, “हवामान बदल ही शेतकऱ्यांसमोरची आजची सर्वात मोठी समस्या आहे. ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर ती सगळीकडे आहे. हे संकट म्हणजे एक मोठी संधी आहे. सौर शेती, कार्बन शेती व पेट्रोलची शेती अशा माध्यमांतून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी व्यवसाय गट स्थापन करावेत. त्यासाठी पाणी फाऊंडेशनने प्रशिक्षणाची सोय केली आहे.”

See also  महाविकास आघाडी ला पाच वर्ष कधी होतील हे भाजपाला समजणार नाही : रोहित पवार

अभिनेते जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांची महती गाणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.