जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी सात हजार गटांची स्थापना

0
slider_4552

पुणे :

जिल्ह्यात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मावळ, पुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मर्गदर्शनाखाली स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून 7 हजार 10 मतदान केंद्रनिहाय जनजागृती गट स्थापन करून सक्रीय करण्यात आले आहेत.

स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी याबाबत माहिती दिली. पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांवर स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय जनजागृती गटांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, शाळा/महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील व नेहरू युवा केंद्रातील विद्यार्थी, नागरी समाज संघटना तसेच समाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

या गटांच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्रनिहाय नावनोंदणी असणाऱ्या मतदारांच्या याद्यांचे त्यांच्यासमोर वाचन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावरील मतदारांच्या अंगणवाडी सेविका, शिक्षक, नियुक्त कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या मदतीने गृहभेटी देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

मतदारांची टक्केवारी कमी असण्याची कारणे शोधून मतदानाची टक्केवारी सुधारण्यासाठी या मतदान केंद्रनिहाय जनजागृती गटांद्वारे मेळावे, व्याख्याने, प्रभात फेरी, सायकल रॅली, विविध स्पर्धांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नवयुवा मतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार, पारलिंगी मतदार यांच्याकरिता केंद्रनिहाय जनजागृती गटांद्वारे विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे तांबे यांनी सांगितले.

See also  उठावं करण्याचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात विजय शिवतारे यांनीचं पेरलं होतं...