सुस :
पुण्यातील सुसगाव येथील बेलाकासा लेबर कॅम्प येथे आज (शुक्रवारी) सकाळी१० वा ४५ मी. सुमारास आग लागली. घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या होत्या.
पत्र्याच्या लेबर कॅम्प मध्ये 30 ते 40 खोल्या आगीत जळून भस्मतात झाल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे आणि त्यांचे कपाटात ठेवलेले पैसे व दागिने जळून राख झाल्याचे पहावयास मिळाले. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.अग्निशामक दलाच्या जवळपास ७ गाड्या एक वॉटर हावझर व टँकर मदतीने आग आटोक्यात आणण्याचे काम करण्यात आले.
यामध्ये कामगारांच्या जळालेल्या नोटा सोन्याचे दागिने शोधण्याची धडपड करताना पहावयास मिळाले. आपापल्या खोल्यांमधील कपाटे बाहेर काढून दिल्यावर कामगारांचे हात भाजत होते, तरी ते आपल्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत होते. जीवन आवश्यक वस्तू सहित सर्वच जळाल्याने जवळपास 30 ते 40 कुटुंबातील नागरिक शोक व्यक्त करत होते. आगीचे मुख्य कारण कळाले नसले तरी कोणीतरी पूजा करून दिवा लावला असल्याने आग लागल्याचे काही कामगारांनी सांगितले.
सर्व कामगार सकाळी कामाला गेले असल्याने लेबर कॅम्पमध्ये कोणी नव्हते. आगीची घटना कळतात कामगारांनी आपापल्या खोलीजवळ धाव घेतली. परंतु हाती काहीच लागले नसल्याने खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी मात्र परिसरातील नागरिकांनी बांधकाम व्यवसायिकांनी या कामगारांना मदत करून त्यांचे जनजीवन सुरळीत करण्याची मागणी केली आहे.