दिल्ली :
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या विषयावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि त्यांचा अहवाल त्यांना सादर केला. 18,626 पानांच्या या अहवालासाठी 2 सप्टेंबर 2023 रोजी एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याने 191 दिवस तज्ञांशी चर्चा करून अहवाल सादर केला.
प्रस्तावित अहवालात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी एकच म्हणजेच सामायिक मतदार यादी तयार करण्याचे म्हटले आहे. सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार केल्या जात आहेत. त्याचबरोबर स्थानिक नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली मतदार यादी प्रसिद्ध केली जाते.
या अहवालाच्या पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या 100 दिवसांच्या आत महापालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेशी जोडण्यास सांगण्यात आले आहे.
“आपल्या लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे. भारताचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद जी यांच्या अध्यक्षतेखाली एकाचवेळी निवडणुकांबाबत उच्चस्तरीय समितीचा अहवाल भारताच्या राष्ट्रपतींना सादर करण्यात आला. मोदी सरकारच्या भूमिकेला दुजोरा देत, पारदर्शकता, सर्वसमावेशकता, सहजता आणि मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकाचवेळी निवडणुका घेण्याची शिफारस केली. –
देशाचे गृहमंत्री अमित शाह”