पुणे :
यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनांसाठीची वेगमर्यादा बदलण्यात आली आहे बोरघाट आणि उर्वरित मार्गावर ही वेगमर्यादा वेगवेगळी करण्यात आली आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
समतोल भागासाठी सध्या 100 किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. तर ही वेगमर्यादा घाटात आल्यानंतर 50 किलोमीटर प्रतितास एवढी आहे. हलक्या वाहनांसाठी घाटातील वेगमर्यादा व्यवहारिकदृष्ट्या अत्यंत कमी आहे.
पुणे ते मुंबई वाहिनीवर अतितीव्र उतार आहे. समतल भागातून 100 किलोमीटर प्रतितास वेगाने घाटात आल्यानंतर वाहनाची वेगमर्यादा 50 किलोमीटर प्रतितास यावर आणताना वाहन चालकांना अडचणी येतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढते. यामुळे महामार्ग प्रशासनाकडून ही वेग मर्यादा नव्याने निश्चित करण्यात आली आहे.
ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह आठ प्रवासी वाहतूक करतात अशी वाहने एम एक श्रेणीतील वाहने समजली जातात. अशा वाहनांसाठी घाटातील वेगमर्यादा 60 किलोमीटर तर उर्वरित मार्गावर 100 किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा करण्यात आली आहे. ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ व त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते अशी वाहने एम दोन व एम तीन या श्रेणीत येतात. या वाहनांसाठी घाट भागात 40 किलोमीटर तर इतर भागात 80 किलोमीटर प्रतितास अशी मर्यादा ठरविण्यात आली आहे.
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी घाट क्षेत्रात 40 किलोमीटर तर इतर भागात 80 किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.