पुणे :
मागील काही दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अखेर केरळ राज्यात दाखल झाला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे. केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने देखील याबाबत माहिती दिली आहे. केरळच्या किनारी मान्सूनला सुरुवात झाली आहे. अपेक्षित वेळेपेक्षा लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याचे राष्ट्रीय हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे शेतीच्या कामाला सुरुवात होईल.
भारतीय हवामान विभागाने 31 मे रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून पुढील दहा दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. तसेच आज कोकण भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या रेमल चक्रीवादळाचा परिणाम केरळ मध्ये येणाऱ्या मान्सूनवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसेच काहीही झाले नाही. त्यामुळे हवामान तज्ञांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.