ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, विशाल-शिवानी अग्रवालसह अश्फाक मकानदारची येरवडा कारागृहात रवानगी

0
slider_4552

पुणे  :

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या आई-वडीलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ससून रुग्णालयात आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींची आज पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहामध्ये करण्यात आली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

ससून रुग्णालयात आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आज विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. विशाल अग्रवालवर मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला कार दिल्याप्रकरणी आणि मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटकेत आहे.

शिवानी अग्रवालने आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ती अटकेत आहे. तर अश्फाक मकानदारने आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांना पैशांची देवाण-घेवाण केली होती त्याप्रकरणी तो अटकेत आहे. आतापर्यंत हे तिघेही पोलिस कोठडीत होते. पण आज सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना येरवडा कारागृहामध्ये पाठवण्यात आले आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाला तपासाबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अश्फाक मकानदारचा ससून हॅास्पिटल, येरवडा पोलिस स्टेशन, बाल न्याय मंडळ याठिकाणी वावर आढळला आहे. अश्फाक ⁠मकानदार आणि विशाल अग्रवाल यांची ससून मधील डॅाक्टरांना पैसे देण्यासाठी मिटिंग झाली होती. या मिटिंगला आणखी कोण हजर होते याचा तपास करायचा आहे. ⁠डॉक्टरांना दिलेल्या ४ लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये जप्त केले आहेत. एक लाख रुपये जप्त करायचे आहेत. त्यासाठी पोलिसांनी अश्फाक मकानदार यांची पोलिस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

See also  दिग्गजांच्या कलाविष्काराने सजणार ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव