पुणे :
विजेची वाढती मागणी व सद्यस्थितीत असलेल्या वीजयंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी लवळे येथील प्रस्तावित नॉलेज सिटी 132/22 केव्ही व पुण्यातील बावधनमध्ये 220/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. या दोन्ही उप केंद्रामुळे बावधन, कोथरूड, वारजे, भूकूम, भूगाव, पिरंगुट, लवळे व नांदे या परिसराला आणखी दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे
पुणे परिमंडलातील वाढती विजेची मागणी व भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी प्रस्तावित 21 अतिउच्चदाब उपकेंद्रांचा आराखडा मुख्यालयास सादर केला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पुणे परिमंडल अंतर्गत चऱ्होली येथे 220 /33 /22 केव्ही प्राईड वर्ल्ड सिटी, मोशी येथे 220/22 केव्ही सफारी पार्क, ताथवडे येथे 220/22 केव्ही यशदा उपकेंद्र, बावधन येथील बावधन 220 /22 केव्ही आणि लवळे येथील नॉलेज सिटी 132/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच भोसरी येथील 220/22 केव्ही सेन्चुरी एन्का उपकेंद्रात 50 एमव्हीए चे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी दिली आहे. हे सर्व मंजूर प्रस्ताव महावितरणकडून महापारेषणकडे पाठविण्यात आले आहेत. अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र उभारणे व क्षमतावाढीचे कामे महापारेषणकडून करण्यात येणार आहे.
महावितरणच्या शिवाजीनगर विभाग अंतर्गत बावधन येथील 220 केव्ही अतिउच्चदाब उप केंद्रामुळे महापारेषणच्या एनसीएल 132/22/11, नांदेड सिटी 220/22 केव्ही आणि 132/22/11 केव्ही उपकेंद्रातील वीजभार कमी होणार आहे. बावधन येथील नव्या उपकेंद्रातील 10 वीजवाहिन्यांद्वारे बावधन, चांदणी चौक, कोथरूड, वारजे परिसरातील 95 हजार वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होईल. तसेच मुळशी विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या नॉलेज सिटी 132/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील 22 केव्हीच्या 15 वीज वाहिन्यांद्वारे भूकूम, भूगाव, पिरंगुट, लवळे, नांदे, नॉलेज सिटी आदी परिसराला वीजपुरवठा करण्यात येईल. त्याचा थेट फायदा सुमारे 65 हजार ग्राहकांना होईल. सोबतच पिरंगुट 220/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील 18 पैकी 4 वीजवाहिन्यांचा भार हा नॉलेज सिटी उप केंद्राकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे पिरंगुट उपकेंद्रातील सध्याचा वीज भार कमी होईल. पर्यायाने या उपकेंद्रातील उर्वरित वीज वाहिन्यांवरील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना देखील आणखी सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होईल.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ- ‘पुणे परिमंडलामध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजपुरवठ्यासाठी वितरण व पारेषण च्या वीज यंत्रणेचे विस्तारीकरण व क्षमतावाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. बावधन व लवळे येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उप केंद्रामुळे महावितरणच्या सर्व वर्गवारीतील सुमारे 1 लाख 60 हजार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होईल’.