एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या चालक वाहकांना मिळणार रोख प्रोत्साहन भत्ता

0
slider_4552

मुंबई :

एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहक यांना अतिरिक्त उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. फेरी पूर्ण झाल्यानंतर आगारात रक्कम जमा करताना अतिरिक्त रकमेतून 20 टक्के रक्कम रोख स्वरूपात तात्काळ दिली जाणार आहे.

प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, तसेच एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी एसटी महामंडळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन तसेच बस मध्ये आगारप्रमुख, स्थानकप्रमुख, कार्यशाळा अधीक्षक यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करणे; अशा उपक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे. इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या पासचे शाळेत जाऊन वितरण केले जात आहे.

या सर्व उपाययोजनांमुळे ऑगस्ट महिन्यात एसटीला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांचा नफा झाला. उत्पन्न वाढीतील सातत्य टिकून राहण्यासाठी एसटीने पुन्हा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक मार्गावरील फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट निर्धारित केले जाणार आहे. निर्धारित उत्पन्न व्यतिरिक्त अधिकचे उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना अतिरिक्त उत्पन्नातील 20 टक्के रक्कम या उपक्रमांतर्गत दिली जाणार आहे.

फेरी पूर्ण झाल्यानंतर चालक आणि वाहक आगारात रक्कम जमा करतात. त्यानंतर निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिकच्या उत्पन्नातून 20 टक्के रोख रक्कम तात्काळ चालक आणि वाहक यांना समप्रमाणात विभागून दिली जाणार आहे.

यामध्ये एसटीने काही नियम व अटी देखील घातल्या आहेत. प्रवाशांच्या तक्रारी, प्रवाशांसोबत गैरवर्तणूक केल्यास तसेच उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित वाहक आणि चालकाला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. या योजनेला चालक आणि वाहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना पुढेही चालू ठेवली जाणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

See also  अनेक दिग्गजांच्या उपस्थित बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण.