मॅकन्यूज : बाणेर प्रतिनिधी :-
सन २००६ पासून ‘वसुंधरा अभियान बाणेर ‘ निसर्ग संवर्धन कार्य करत असून, आतापर्यंत ‘तुकाई टेकडी बाणेर’ येथे २६,००० हुन अधिक देशी ,आयुर्वेदिक झाडे लावून जगवली आहेत, त्यासाठी २९ पाण्याच्या टाक्या स्वतः बांधल्या असून, संस्था वृक्षारोपण संवर्धन सोबत रक्तदान शिबीर, पाणी फाउंडेशन, पालखी मार्ग वृक्षारोपण, गड किल्ले स्वच्छता , नदी स्वच्छता मोहीम अशा विविध सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहे. दरवर्षी तुकाई टेकडी बाणेर येथे वसुंधरा अभियान कडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संस्थेकडून ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये भारतातून ६ राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ३ गटामध्ये एकूण ४२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रविवार दि. ६ डिसेंबर २०२० रोजी तुकाई टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विजेत्यांना ट्रॉफी, रोख रक्कम व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. परिक्षकांचे काम ललित कला प्रबोधिनी पुणे चे चित्रकार खेमचंद खैरनार (पुणे), रुपेश कुलकर्णी (धुळे), ममता बोरा (बंगलोर), श्री. विशाल खैरनार (पुणे), आरती शूल (पुणे) व राष्ट्रीय फोटोग्राफी पुरस्कार विजेते श्रीकांत शिंपी यांनी पाहिले.
विजेत्यांचा व परिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वसुंधरा अभियान कडून यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विजेते पुढीलप्रमाणे –
गट १ (१ ली ते ५ वी) विजेते प्रथम दिती केतुल शहा (पुणे), द्वितीय – रुद्रनील अजित शिंदे (पुणे), तृतीय – संस्कृती संतोष शिंदे (पुणे) ,
गट 2 (६ वी ते १० वी) विजेते प्रथम ऋतुजा पंचप्पा गायकवाड (पुणे) , द्वितीय-पायल संतोष पिंगे (विरार, मुंबई) , तृतीय – सजल जैन (आग्रा) व अवनी सोनगिरे (पुणे)
गट 3 (खुला) विजेते प्रथम – राधा म्हापनकर (पुणे), द्वितीय – नुपूर जितेंद्र पाटील (पुणे), तृतीय – पूजा कनोजिया (लखनऊ, उत्तर प्रदेश)