पुणे :
मुंबईपाठोपाठ पुणे महापालिकेची सुद्धा वर्षभरावर निवडणूक येऊन ठेपली आहे. पण आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांना ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुणे पालिका निवडणूक १ वर्षावर येऊन ठेपल्याने राज यांनी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्राचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत.
तसंच पक्षाने हिंदुत्ववादी भूमिका वळण घेतलं असलं तरी निवडणुकीत ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका असावी, अशी बहुसंख्य मनसैनिकांची भावना असल्याचं पदाधिकाऱ्यांनी राज यांच्या कानावर घातलं, अशी सूत्रांनी माहिती दिली.
सध्या मनसेचे केवळ २ नगरसेवक पुणे पालिकेत आहेत. २०१२ साली २९ नगरसेवक होते. तेव्हा पक्ष २ ऱ्या क्रमांकावर होता. राज ठाकरे एकट्याने लढणार का? भाजपासोबत युती करणार हे गुलदस्त्यात आहे. सध्या तरी कामाला लागा एवढाच संदेश त्यांनी दिला आहे. मनसेचा वर्धापन दिन पुढच्या महिन्यात आहे. त्याच दिवशी राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी अटकळ आहे.