पुणे :
पी. ई. एस. मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम, शिवाजीनगर – पुणे – ५ शाळेत ७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी, इंडियन एअर फोर्समधील स्क्वाड्रन लीडर सौरभ धर्माधिकारी यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.
चिकाटी, जिद्द, शाळेतील अभासक्रम व संस्कार या त्रिसूत्रीमुळे यशस्वी झालो, याचा मला अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये यांचा सहभाग होता. त्यासाठी नुकताच त्यांना ‘प्रेसिडेंशिअल गॅलन्ट्री अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. भ्रमणध्वनी यंत्राचा कमीत कमी वापर, इंग्रजी वर्तमानपत्राचे वाचन, दैनंदिन व्यायाम, एन. सी. सी. चे प्रशिक्षण, उत्तम अभ्यास याकडे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष द्यावे, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सामूहिक शिस्तबद्ध कवायतीचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. देशभक्तीपर गीत आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील नाट्यछटा सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, संस्थेचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, सहसचिव प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, उपसचिव प्रा. डॉ. प्रकाश दीक्षित यांनी याप्रसंगी विद्यार्थी व पालकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून सामूहिक पसायदान गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.