अमरावती :
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात आज (८ फेब्रुवारी) भर बैठकीत जुंपली आहे. अमरावती विभागातील वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान निधीच्या मागणीवरून या दोन्ही नेत्यांमध्ये मोठा शाब्दिक वाद झाल्याचे वृत्त आहे. ‘विदर्भाचा अनुशेष भरून निघण्यासाठी अधिक निधीची मागणी केली होती. मात्र, निधी वाढवून देण्यात आला नाही. पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू’, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.




बच्चू कडू निधीविषयी नाराजी व्यक्त करताना म्हणाले, ‘मी सरकारमध्ये आहे त्यामुळे बोलू शकत नाही. विदर्भाचा अनुशेष भरून निघण्यासाठी आपण अधिक निधीची मागणी केली होती.
मात्र निधी वाढवून दिला गेला नाही. आम्ही निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करू’, असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, अजित पवारांनी अकोला जिल्ह्यासाठी थोडा निधी वाढवून दिला असला तरीही बच्चू कडू या मिळालेल्या निधीबाबत नाराज असल्याचेच दिसते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना, ‘विभागातील सर्व ५ जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी दिला आहे’, असे सांगितले. मात्र, दुसरीकडे बच्चू कडू या निधीवर नाराजच आहेत. या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यवतमाळ ३२५ कोटी, बुलढाणा २९५ कोटी, वाशिम १८५ कोटी तर अकोल्यासाठी १८५ कोटींचा निधी देण्यात आला. मात्र, अकोल्याच्या निधीबाबत बच्चू कडू प्रचंड नाराज आहेत.








