पुणे :
महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. पुणे शहरात देखील शिवजयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर पार पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमूल्य योगदान देणाऱ्या सरदारांचे वंशज या दिवशी एकत्र येतात व शोभा यात्रा देखील काढली जाते.
पुणे महापालिकेसह इतर सरदारांच्या वंशजांचे रथ या सोहळ्यात सहभागी होतात. राज्यभरातून शिवभक्त या सोहळ्यासाठी येत असतात. ढोल पथक, पारंपरिक मर्दानी खेळ, पारंपरिक पेहराव यामुळे उत्साही वातावरण निर्माण होत असतं.तर, शहरातील विविध भागात समाज उपयोगी कार्यक्रम राबवत शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
यंदा, कोरोनाच्या सावटामुळे ही जयंती महापालिकेतर्फे कशाप्रकारे साजरी केली जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्या कोरोनाचा प्रभाव हा कमी झाला असला तरी धोका कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेत बैठक पार पडली. ‘आपल्या पुणे शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. पण गेल्या दहा महिन्यांपासून सर्व जगावर असलेले कोरोनाचे संकट कमी होत असले तरी काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे.’ असं महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
शिवजयंती साजरी करण्याबाबत पुणे महानगरपालिकेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पालिकेतील पदाधिकारी, पक्षनेते, नगरसेवक यांची विचारविनिमय बैठक पार पडली. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, तसेच पदाधिकारी, अधिकारी व शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता आलेल्या मान्यवरांच्या सूचनांचा विचार करून लवकरच शिवजयंती साजरी करण्याबाबत नियमावली सादर केली जाईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आपल्या पुणे शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. पण गेल्या दहा महिन्यांपासून सर्व जगावर असलेले कोरोनाचे संकट कमी होत असले तरी काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. pic.twitter.com/K776izdcxZ
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 8, 2021