पुणे :
पुण्यात ज्या चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. मुळात हे चोरटेच पोलिसांना घाबरले होते. म्हणूनच या चोरट्यांनी घटना घडली तेव्हा आरडाओरडा केला होता. पण या गोंधळात चोरट्यांना घाबरून पोलिसांनाच पळ काढला होता. 28 डिसेंबरला चतुशृंगी हद्दीत औंध येथे घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
औंध येथे घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पुणे पोलीस चर्चा सर्वत्र रंगली होती. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोलिसांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं. अखेर त्या चौघांपैकी तिघांना बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. आधी बिंतु सिंग कल्याणी या आरोपीला अटक करण्यात आलं होतं. सोमवार दि. ८ फेब्रुवारी रोजी बिरजू सिंग दुधानी, सनी सिंग दुधानी यांना अटक करण्यात आली.
अशाप्रकारे पोलिसांनी ४ पैकी ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील चौथा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. आत्ता अटक करण्यात आलेल्या दोघांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण 77 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलीय.