क्रीडा –
भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटने करोनाच्या संकटानंतर प्रथमच रिंगणात पाऊल ठेवले. या पहिल्याच सामन्यात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. युक्रेनच्या प्रशिक्षक व खेळाडूंच्या सन्मानार्थ तसेच जे खेळाडू निधन पावले त्यांच्या स्मरणार्थ सुरु झालेल्या स्पर्धेत विनेशने बेलारूसच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या व्हि. कलादझीन्सकीचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.




कलादझीन्सकी जागतिक कुस्ती क्रमवारीत सातव्या स्थानावर असून तिला या स्पर्धेची संभाव्य विजेती मानले जात होते. विनेशने आपली सगळी गुणवत्ता व अनुभव पणाला लावत तिला आस्मान दाखवले.
विनेश या स्पर्धेत 53 किलो वजनी गटात खेळत असून तिने सामना सुरू झाल्यावर लगेचच 4-0 अशी आघाडी घेतली मात्र, कलादझीन्सकीने जोरदार पुनरागमन करत 4-4 अशी बरोबरी केली. त्यानंतर हा सामना 5-4 अशा अवस्थेत असताना विनेशने त्यानंतर मात्र, कलादझीन्सकीला प्रतिकाराची संधीच दिली नाही व हा सामना 10-8 असा जिंकत सुवर्णपदक पटकावले.








