मुंबई :
आयपीएलचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये हा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्सच्या खराब सुरुवातीनंतर मोईन अली आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना यांनी चेन्नईला सावरलं. याचवेळी वरिष्ठ खेळाडूनं दिलेला मंत्र दिल्ली कॅपिटल्सच्या कामी आला.




चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. पृथ्वी शॉने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.
युवा फलंदाज रिषभ पंतचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. या पहिल्याच सामन्यात रिषभची गाठ त्याचा गुरु महेंद्रसिंह धोनीसोबत होती. त्यामुळे पंत कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष होत. याचदरम्यान, सामन्यात रिषभ पंतने देखील विजयी चौकार लावत सामना जिंकला आहे.








