पुणे :
अन्नधान्य,फळे, भाजीपाला यांची गगना अत्यावश्यक सेवांमध्ये होते. त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरू करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी सोमवारी (12एप्रिल)दिले. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना देण्यात आले आहेत.
या आदेशात सोनी यांनी म्हटलं आहे की, ‘ कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही बाजार समित्या बंद ठेवल्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली असली तरी अन्न,फळे, भाजीपाला पुरवठा साखळी सुरळीत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाला रोखण्यासाठीच्या आवश्यकता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून राज्यातील बाजार समित्या सुरू ठेवणे आवश्यक आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी आपला जिल्हा, शहर,पोलीस जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी समन्वय साधत सहकार्य घेऊन आपल्या जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू राहतील याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या बाजार समित्यांवर शासकीय अधिकारी हा शासन नियुक्त प्रशासक किंवा सचिव म्हणून कार्यरत आहे अशा प्रशासक सचिव यांनी विशेष लक्ष देऊन काळजी घेणे आवश्यक आहे. बाजार समित्यांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी शेतमाल निहाय चक्राकार पद्धतीने बाजार समितीत सुरू ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात असं सोनी यांनी आदेशात म्हटले आहे.