पुणेः
पुण्यात करोनाचा कहर वाढत असतानाच, प्रतिबंधासाठी लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लस खरेदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून लशींचा साठा सातत्याने कमी येत आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्यासोबत चर्चा करुन कोविशिल्ड लस खरेदी करणार आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
कोविशिल्ड लस सिरमकडून खरेदीसाठी प्रयत्नशील, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. १ मेपासून करोना लस खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपण पुणे महापालिकेच्यावतीने थेट लस खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संपर्क साधणार असून याबाबतची स्पष्टता लवकरच येईल. सिरमकडून लस उपलब्ध झाल्यास पुणेकरांचे लसीकरण वेगानं पूर्णत्वास जाण्यास मदत होईल, असं महापौरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, करोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी झाली असून लसीकरणात दीड कोटींचा टप्पा राज्यानं गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
कोविशील्ड लस @SerumInstIndia कडून खरेदीसाठी प्रयत्नशील !
१ मेपासून कोरोना लस खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपण पुणे महापालिकेच्या वतीने थेट लस खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सिरमचे सीईओ @adarpoonawalla यांच्याशी
(१/२)
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 27, 2021