नवी दिल्लीः
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. १०७५ या हेल्पलाइन नंबरवर देशातून कुठूनही फोन करून नागरिकांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घेत येणार आहे. याचा फायदा जे इंटरनेटचा उपयोग करत नाही, त्यांना होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी दिली. ग्रामीण भारतातील लसीकरणासाठी या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यासाठी आम्ही १ हजारांहून अधिक कॉल सेंटर सुरू केले आहेत. देशातील कोताही नागरिक कॉल करून लसीकरणासाठी आपली अपॉइंटमेट बुक करू शकतो. ग्रामीण भागातील लसीकरणाचे स्लॉट बुक करण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी करणारे सर्व सामान्य सेवा केंद्र काम करतील, असं त्यांनी सांगितलं.
देशातील ४५ वर्षांवरील निम्म्याहून अधिक नागरिक हे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करत आहेत आणि लस घेत आहेत. पण १८ ते ४४ वर्षादरम्यानच्या नागरिकांसाठी लसीचा पुरवठा कमी होत असल्याने तिथे समस्या आहे. मात्र ही समस्या कायम स्वरुपी नाही, असं त्यांनी सांगितलं.
कोविन ॲपवरील नोंदणीची व्यवस्था पारदर्शी आहे. व्हीव्हीआयपी असो की सामान्य नागरिक सर्वजण लसीकरणासाठी एकाच ॲपचा उपयोग करत आहेत. यंत्रणेसाठी सर्वजण एकसमान आहेत, हे यावरून स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले. जिल्हाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी हे जनजागृती करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणासाठी सहकार्य करत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणापासून वंचित करण्यात आलं आहे, असं आता म्हणता येणार नाही.
करोना संकटात नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने ४ हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. या हेल्पलाइन नंबरमध्ये आरोग्य मंत्रालयाचा 1075, महिला आणि बालविकास मंत्रालयाची चाइल्ड हेल्पलाइन 1098 आणि सामाजिक न्याय मंत्रलायची ज्येष्ठ नागरिकांसाठीची हेल्पलाइन 14567 आणि नॅशनल मेंटल हेल्थ ऑफ न्यूरो सायन्सेसच्या 08046110007 या हेल्पलाइनचा समावेश आहे.