पुणे :
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी राज्यसरकारकडून मुदतवाढ न मिळाल्यामुळे बुधवारी पदभार सोडला आहे. डॉ.राजेंद्र जगताप हे या आधी संरक्षण दलात आयडीइएस या पदावर कार्यरत होते. संरक्षण दलातून प्रतिनियुक्ती घेऊन त्यांनी पीएमपीचएल चा पदभार स्वीकारला होता. PMPML अध्यक्षपद सोडल्यानंतर जगताप हे पुन्हा संरक्षण दलात रूजू झाले आहेत.
जगताप यांना आज दिनांक 30 जून रोजी मुदतवाढीचे पत्र येणे अपेक्षित होते. मात्र शासनाकडून पत्र न आल्याने त्यांनी पदभार सोडला असून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरनार यांच्याकडे पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे जगताप यांच्या आधी पीएमपीएल चे अध्यक्ष होते. मुंढे यांच्यानंतर २४ जुलै २०२० रोजी प्रतिनियुक्ती घेऊन डॉ.जगताप हे पीएमपीएल चे अध्यक्ष झाले होते. त्यांचा या पदावर एकूण ११ महिने कार्यकाळ राहिला आहे. त्यांनी या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अटल बससेवा योजनेच्या माध्यमातून अवघ्या पाच रुपयांत प्रवाससेवा देणारी योजना त्यांच्या कार्यकाळात सुरु करण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून बंद असलेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी सेवा पुन्हा सुरू कार्यान्वित केली. केंद्र सरकारच्या फेम २ या योजने अंतर्गत ई-बस सेवा, पुणे विमानतळाहून वातानुकूलित ‘अभी’ नावाची बस सेवा करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला. पीएमपीएल च्या उत्पन्नवाढीसाठी त्यांनी नवनवीन प्रयोग देखील राबवले आहेत. तसेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आले.