काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द

0
slider_4552

पुणे :

महापालिकेच्या प्रभाग क्र. 19 अ मधील माजी राज्यमंत्री आणि कॉग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने बागवे यांना वरील न्यायालयात अपील करण्याची संधी दिली असून त्यासाठी 17 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अविनाश बागवे आणि अ‍ॅड. भूपेंद्र शेडगे यांनी प्रभाग 19 अ मधून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. बागवे हे काँग्रेस पक्षाकडून तर शेडगे हे मनसेकडून निवडणूक लढवली होती. अर्ज छाननीच्या वेळी अविनाश बागवे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व नामनिर्देशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती ही विसंगत व अपूर्ण तसेच खोटी असल्यामुळे भूपेंद्र शेडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत उपस्थित केली होती. परंतु त्याची हरकत फेटाळून लावली.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शेडगे यांची हरकत फेटाळून लावल्याने शेडगे यांनी मुख्य लघुवाद न्यायालय पुणे येथे निवडणूक याचिका दाखल केली होती. या निवडणूक याचिकेमध्ये झालेल्या साक्षी, तपासणी, उलटतपासणी, पुरावे व दाखल कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करुन तसेच कायद्याच्या तरतुदींचे विचार करुन न्यायालयाने 29 जून रोजी निकाल दिला. न्यायालयाने महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1969 चे कलम 10 (1) (डी) अन्वये अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द केले. या प्रकरणात भूपेंद्र शेडगे यांच्यावतीने अ‍ॅड. नरेश गायकवड, अ‍ॅड. रफिक शेख, अ‍ॅड. योगेश डावरे यांनी काम पाहिले.

See also  पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये महापालिकेची वैद्यकीय शहरी गरीब योजनेस मान्यता