स्लोवाकिया :
अनेक दशकांपासून फ्लाईंग कार ही एक कल्पना होती. फ्लाईंग कार म्हणजे असे वाहन जे रस्त्यावर प्रवास करेल आणि जे आकाशातदेखील उडेल. तंत्रज्ञानाच्या पातळीवर असे वाहन बनवणे हे एक आव्हानच होते. मात्र मागील काही वर्षात तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आणि अनेक कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केले. त्याचा परिणाम होत अनेक प्रयोग होत आता फ्लाईंग कार ही परीकथेतील कल्पना राहिली नसून ते आता एक वास्तव झाले आहे. एअरकार या कंपनीने अशी एक फ्लाईंग कार तयार केली आहे. या कारने पहिल्यांदा दोन शहरांमधील प्रवास म्हणजे इंटर सिटी फ्लाईंग पूर्ण केली आहे.
वाहतुकीसाठी फ्लाईंग कार तयार
एअरकारने घेतलेल्या या चाचणीत फ्लाईंग कारने स्लोवाकियामधील नित्रा आणि ब्रातिस्लावा दोन इंटरनॅशनल एअरपोर्ट्समध्ये २८ जूनला हा प्रवास पूर्ण केला आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी फ्लाईंग कारला ३५ मिनिटांचा वेळ घेतला. एअरकारने यासंदर्भात आपले प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. आकाशातून विमानतळावर उतरल्यावर फक्त एक बटण दाबल्यावर या उडणाऱ्या वाहनाचे रुपांतर एका शानदार स्पोर्ट्सकारमध्ये झाले. या फ्लाईंग कारमध्ये १६० एचपी बीएमडब्ल्यू इंजिन आहे. शिवाय यामध्ये एक फिक्स्ड प्रोपेलर आणि बॅलिस्टिक पॅराशूटदेखील आहे. एअरकारने दिलेल्या माहितीनुसार ही फ्लाईंग कार ८,२०० फूटांच्या उंचीवर १,००० किलोमीटर अंतर उडू शकते. या फ्लाईंग कारचा वेग १७० किलोमीटर प्रति तास इतका आहे.
फक्त दोन मिनिटात कारचे विमान आणि विमानाची कार
फ्लाईंग कारने आतापर्यत ४० तासांचा प्रवास केला आहे. शिवाय फ्लाईंग कारच्या चाचणीदरम्यान विविध क्षमतांचीही तपासणी करण्यात आली. ही फ्लाईंग कार ४५ अंशात वळण घेऊ शकते. आकाशात उडताना ही फ्लाईंग कार स्थिर असते. विशेष म्हणजे कारमधून विमानात रुपांतरित होण्यासाठी या फ्लाईंग कारला फक्त २ मिनिटे आणि १५ सेकंदांचा कालावधी लागतो, अशा दावाही फ्लाईंग कारची निर्मिती करणाऱ्या एअरकार या कंपनीने केला आहे.
ट्रॅफिकवर फ्लाईंग कारचा इलाज
फ्लाईंग कारची चर्चा ही मागील काही वर्षांपासून सातत्याने होत आली आहे. बदलत्या काळात जागतिक वाहतूक व्यवस्थेत फ्लाईंग कारसारखे हवेत आणि जमिनीवर प्रवास करणारे वाहन असावे अशी आवश्यकता व्यक्त करण्यात येत होती. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि ग्राहकांच्या गरजेनुरुप वाहतूक व्यवस्था तयार करणे शक्य होणार आहे. फ्लाईंग कारसारखे वाहन हे भविष्यातील शहरांतर्गत आणि दोन शहरांमध्ये प्रवास करण्याचे साधन होईल असे मानन्यात येते आहे. शहरांमधील रस्ते दिवसेंदिवस वाहनांच्या गर्दीने फुलून जात असल्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ घटवण्यासाठी फ्लाईंग कार हा चांगला पर्याय ठरू शकेल असा विचार जगभरातून व्यक्त होत होता.
फ्लाईंग कार बदलणार जगाची वाहतूक व्यवस्था
उबरसारख्या वाहनांची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनीदेखील ते फ्लाईंग कारसारख्या वाहनांवर काम करत असून भविष्यात या वाहनांद्वारे वाहतूक करण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले आहे. ओला, उबर सारख्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी फ्लाईंग कारची सेवा पुरवल्यास जगातील वाहतूक व्यवस्थेत नजीकच्या भविष्यात मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. ह्युंदाईसारख्या काही कार उत्पादक कंपन्यांदेखील फ्लाईंग कारच्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.