दिल्ली :
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार आणि भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखीही बांधली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवारवाड्याच्या जिर्णोद्धारासाठी निधी, आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसंच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी 5 लाख ₹ अथवा दरमहा 5000 ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांकडे केली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, असं ट्वीट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.
त्याचबरोबर पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट म्हणजे अलौकिक, अद्वितीय व्यक्तिमत्वाची अविस्मरणीय भेट असल्याचंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय.