मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन’ यांच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ (स्वित्झर्लंड) हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात 70 देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सदर संस्था मार्फत व्यक्ती व संस्थाना सम्मानित करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय, वैदकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य आदी कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे.
अजित पवार हे दर आठवड्याच्या शुक्रवारी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहरात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करतात आणि या बैठकीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांकडून कोरोना संदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतात. तसेच रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाय योजना राबविण्याचा तातडीने निर्णय घेतात.
याशिवाय दर शनिवारी आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात देखील अशाच पद्धतीच्या कोरोना आढावा बैठकीला ते उपस्थित राहतात. राज्यमंत्री मंडळातल्या बहुतांश पालकमंत्र्यांनीपैकी अशी दर आठवड्याला आढावा बैठक घेणारे अजित पवार हे एकमेव पालकमंत्री आहेत. त्यांच्या या कामाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली आहे.
या उपक्रमाअंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात सदर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.