पुणे :
बेळगाव महापालिकेमध्ये भाजपने यश मिळवल्यानंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेळगाव झाकी आहे का नाही हे माहिती नाही, परंतु मुंबई अभी बाकी है, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत 58 जागांपैकी 36 जागांवर भाजपने यश मिळवलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठी माणुस हरल्यानंतर पेढे वाटता का?, असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रतिउत्तर दिल आहे. ज्यावेळेस तुम्हाला विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगलं असतं. मात्र पराभव झाला की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असतो. हा विरोधकांचा हा स्वभावाच आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे येणारी मुंबई महापालिका निवडणुक भाजपचं लक्ष असणार आहे. हैद्राबादमध्ये आम्ही ज्या पध्दतीने लढलो त्याचं पध्दतीने मुंबईमध्ये लढणार आहोत. हैद्राबाद महापालिकेत आमचे केवळ 2 नगरसेवक होते. परंतु आम्ही दोनवरुन 51 पर्यंत गेलो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, बेळगावच्या सीमावादाबाबात चंद्रकांत पाटलांना विचारले असता, आम्ही मराठी माणसाच्या बाजुने आहोत. बेळगावात मराठी माणसाला सन्मानाचं जीवन जगता यायला हवं. हा मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, अशी भाजपची भुमिका असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.