इंग्लंड :
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. परंतु हा कसोटी सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी बीसीसीआय आणि ईसीबीने मिळून ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. दरम्यान या मालिकेतील अंतिम सामना पुन्हा कधीतरी खेळवला जाईल? असे म्हटले जात होते. परंतु ईसीबीच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ची आघाडी घेतली होती. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु हा सामना रद्द झाल्यानंतर पुन्हा केव्हातरी हा सामना खेळवण्यात येईल असे म्हटले जात होते. परंतु ईसीबीच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ही मालिका समाप्त झाली आहे.
त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मालिकेतील उर्वरित सामना पुढे कधी झाला तरी देखील तो मालिकेचा भाग नसेल. तो एकमेव कसोटी सामना असेल. आमच्यासाठी ही मालिका समाप्त झाली असून आयसीसी अंतिम निर्णय घेईल.”
मँचेस्टर कसोटी सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जेव्हा पहिल्यांदाच विधान केले होते. त्यामध्ये इंग्लंड संघाने स्वतःला विजेता घोषित केले होते. मात्र, यानंतर त्यांनी ही गोष्ट प्रेस रिलीझमधून काढून टाकली होती. ईसीबीचे असे म्हणणे आहे की, ही मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे आणि म्हणूनच त्यांनी अंतिम निर्णय आयसीसीवर सोडला आहे.