औरंगाबाद:
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात.
मागील वर्षी कोविडमुळे शाळा सुरु नव्हत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकच गणवेश मंजूर झाला होत. यंदा मात्र समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येणार आहे. या गणवेशांसाठीचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. ही गणवेश वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनेच गणवेश खरेदी करण्याच्या सूचना समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
36 लाख विद्यार्थ्यांना लाभ
जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती-जमाती, संवार्गातील मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना गणवेश वाटप केले जातील. अशा प्रकारे राज्यातील एकूण 36 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी एकूण 600 रुपयांचा निधी नमंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे 36 लाख विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी एकूण 216 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यंदा विद्यार्थ्याच्या खात्यात रक्कम नाही
दरम्यान, यापूर्वी गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होती. मात्र यावेळी या प्रकारात बदल करून गणवेश वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनेच गणवेश खरेदी करण्याच्या सूचना समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद स्तरावर त्या त्या जिल्ह्यांना मंजूर निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदांनी हा निधी थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात 15 दिवसांत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप थांबणार
राज्यातील शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदीबाबत निर्णय घेतल्यानंतर त्यात वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारचा बदल करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होणारा हस्तक्षेप थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.