शिवसेनेचे विजय शिवतारे यांची सत्तेत असलो तरी कार्यकर्त्यात ताळमेळ नसल्याची कबुली

0
slider_4552

पुणे :

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पहिल्यांदाच राज्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव असल्याची जाहीर कबुली दिली आहे. वर सत्तेत आपण एकत्र असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही, अशी कबुलीच विजय शिवतारे यांनी दिली आहे.पुण्यातील जाहीर सभेत विजय शिवतारे यांनी ही कबुली दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे वन मॅन आर्मी आहेत. त्यांच्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे, असं सांगतानाच वर आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री आपलेच आहेत. महाविकास आघाडी आपली आहे. सत्तेत येण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण खाली तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसत नाही, असं शिवतारे यांनी सांगितलं. वर नेते एकत्र आले तरी खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच आहे. संघटनेने शिवसैनिकाला बळ द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही नाव न घेता टीका

पुणे जिल्ह्याचं अर्थकारण पुणे जिल्हा बँकेवर अवलंबून आहे. जिथे जिथे शिवसेनाचा उमेदवार स्ट्राँग असेल तिथे त्याचं खच्चीकरण केलं जातं. ही तक्रार करत नाही. पण सांगावसं वाटतं, असं त्यांनी सांगितलं. प्रश्न फक्त पुरंदरपुरता मर्यादित नाही तर प्रश्न जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचा आहे. असं असलं तरी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणूच. त्यासाठी आम्ही जिवाचं रान करू, असंही त्यांनी सांगितलं.यावेळी शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. मावळमध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात बारणे यांना निवडून आण्यासाठी आपण ताकतीने लढलो आणि आपली सीट आणली. त्यामुळेच या गोष्टीची खुन्नस खाऊन विजय शिवतरे कसा निवडून येतो असे हे लोक म्हणायचे, असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला. यावर अधिक बोलणं योग्य नाही. जास्त बोलण्याचा परिणाम मी भोगत आहे, असंही ते म्हणाले.

महानगरपालिकेत आपलाच महापौर होईल

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आपलाच झाला पाहिजे असं आवाहन केलं. दिल्लीमध्ये मी राहतो. लोकांना मी पत्ता सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर राहतात. त्यामुळे लोक मलाही ओळखतात. ही शिवसेनेची ताकद आहे, असं ते म्हणाले. आता भोसरीमध्ये मेळावा सुरू आहे. स्टेजवर मोठी गर्दी जमली आहे. मात्र, भोसरी भागात एकही नगरसेवक आपला निवडणून आला नाही ही खंत आहे. या स्टेजवर बसलेल्यांनी प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत आपली सत्ता येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपलाच महापौर होईल. त्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन राऊत यांनी केलं. महाराष्ट्रातील सत्ता आपली आहे. नुसतं पद आहे म्हणून नाही तर शिवसैनीकच्या मनगटात ताकद आहे म्हणून आपली सत्ता आहे, असंही ते म्हणाले.

See also  पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह हाऊसफुल, क्षमतेपेक्षा अडीचपट जास्त कैदी !