आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्य पर्यटन केंद्र होण्याची देशात क्षमता : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

0
slider_4552

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आरोग्य क्षेत्र विकासासोबत जुळले. देशाच्या आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी असून, आंतरराष्ट्रीय आरोग्य केंद्र होण्याची क्षमता देशात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज गुरुवारी केले. ते सीआयआयने आयोजित केलेल्या आरोग्य परिषदेत बोलत होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्य पर्यटन केंद्र होण्याची क्षमता देशात असल्याने आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यापूर्वी केवळ उपचार म्हणजे आरोग्य असे समजले जायचे. मात्र, आता आरोग्यासोबत विकासही जोडला गेला आहे. समाज निरोगी असल्यास देशाची भरभराट होऊ शकेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा एक मुख्य विचार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक काळजी हा आरोग्य क्षेत्राचा अत्यावश्यक घटक आहे, यावर जोर देताना त्यांनी सांगितले की, खेलो इंडिया आणि योग यासारखे उपक्रम निरोगी समाजाचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आरोग्य क्षेत्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपलब्धता, परवडणारे उपचार, दायित्व आणि जागरूकतेबाबत सरकार वचनबद्ध आहे आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकार त्या दिशेने काम करीत आहे, असे मांडविया यांनी सांगितले.

देशातील आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठ्या प्रमाणात संधी आहे. आयुष्मान भारत, आयुष्मान आरोग्य आणि कल्याण केंद्रे, प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र, आयुष्मान भारत डिजिटल मिशन आणि पंतप्रधान आयुष्मान आरोग्य पायाभूत योजना यासारख्या विविध योजना केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. परवडणार्‍या दरात सर्वांना उपचार मिळावेत, यासाठी या योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

See also  भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा च्या सहा दहशतवाद्यांना केले ठार